कोर्टामार्फत घटस्फोट कसा घ्यावा

                कोर्टामार्फत घटस्फोट कसा घ्यावा

             


    काही दिवसांपूर्वी एक शिक्षक दाम्पत्य पक्षकार म्हणून माझ्याकडे आलं होत. त्यांना परस्पर संमतीने घटस्फोट घ्यायचा होता. परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याची कायदेशीर प्रक्रिया मी त्यांना समजावून सांगितली. त्या अनुसार आम्ही कोर्टात पिटिशन दाखल केल. लग्नाला केवळ दीड वर्ष झालेल आहे ही पाहून मे. कोर्टाने त्यांच प्रकरण मेडीएशन करण्यासाठी मेडिएटरकडे पाठवलं आणि कायद्यानुसार 6 महिन्यांचा कालावधी दिला, तडजोड होते आहे का हे पाहण्यासाठी!

    थोड्या दिवसांनी ही दोघेही माझ्याकडे पुन्हा आले, “मॅडम आम्हा दोघांना त्वरीत  घटस्फोट पाहिजे. इतके दिवस थांबण माझ्याचनी  शक्य नाही. मला आता स्थळं येऊ लागली आहेत.”

    "अहो, पण तुम्ही कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे ना? विहित कालावधी संपल्यानंतर कोर्ट तुमच्या अर्जावर आदेश करेलच".

    "काहीही सांगता का हो मॅडम? आमच्या एका ओळखी च्यांनी एका दिवसात घटस्फोट घेतलेला आहे तोही परस्पर संमतीने! त्यांनीच आम्हाला सांगितलं आणि खुळ्यात सुद्धा काढल ही 6 महीने थांबायची भानगड आलीच कुठून?"

    मी येनं-केनं प्रकारे त्यांना समजावून सांगितलं. 

    खरं सांगू का? जगातले सर्व तऱ्हेचे पक्षकार एकीकडे आणि शिक्षक असलेले पक्षकार एकीकडे! यांना समजावून सांगताना आपल्या बुद्धिमत्तेचा अक्षरशः कस लागतो. 

    "लै सोप्पं असत, 100 रूपयाच्या स्टॅम्प वर मसुदा छापायचा आणि नॉटरीचा शिक्का घ्यायचा. कशाला 6 महीने लागतात हो? तुम्ही जे कोर्टात दाखल केल आहे नं तोच मसुदा आपल्याला स्टॅम्प वर छापायचा आहे. "

    मला यांच्या अगाध ज्ञानावर हसू आलं आणि कीव सुद्धा वाटली कारण आशा बेकायदेशीर गोष्टींना सर्वसामान्यांनी बळी पडाव असं व्यापक वास्तव आपल्या भारतात आहे. मी त्यांना 'हिंदू विवाह कायदा, 1955' चा बेअर अॅक्ट दाखवला.

'    "सर पुस्तक उघडा आणि कलम 13(ब) मोठ्याने वाचा". सरांनीही हो-नाही करत कलम 13(ब) इंग्लिश मधून वाचला. 

    "हम्म, सांगा सर काय समजलं? कायद्याची भाषा समजायला जरा अवघड असते. पण वाचलेल्या कलमात कुठेही नोटरी, स्टॅम्प यांसारखे शब्द तुम्ही वाचलेत का? त्यामुळे वकिलांच न ऐकता कायद्याचं बोट धरून चालला नाहीत, आणि  ओळखीच्या लोकांचं ऐकून वागलात तर तुम्हीच अडचणीत याल! स्टॅम्प पेपरवर केलेल्या नोटरी घटस्फोटाला कायद्याच्या दृष्टीने काहीही किंमत नाही."

    जुन्या हिंदू कायद्यात घटस्फोट ही संकल्पना नव्हती. कारण लग्न संबंधाना ७ जन्माचं बंधन समजलं जायचं. पण हिंदू विवाह कायदा, १९५५ जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा कलम १३ ने घटस्फोटाची संकल्पना हिंदू कायद्यात आणली गेली. हा कायदा भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद ४४ नुसार जैन, बुद्ध, शीख यांना देखील लागू होतो. हिंदू विवाहाच्या या अटी कलम ५  मध्ये तर विवाहाचे विधी कलम ७  मध्ये नमूद केले आहेत. हा कायदा काही विशिष्ट नात्यातील विवाहाला प्रतिबंधित करतो. तर कलम ७ मध्ये सप्तपदी सारख्या विधीचा समावेश होतो. सप्तपदी मध्ये विवाहबद्ध होणाऱ्या दोघांनी ही पवित्र अग्नीच्या साक्षीने ७ पावले एकत्र चालणे अपेक्षित आहे. विवाहाच्या विधी तेव्हाच पूर्ण झाल्या असे मानले जाते, जेव्हा ७ वे पाऊल पूर्ण होते.

     आता कलम १३ मध्ये ८ कारणे दिली आहेत ज्यामध्ये पती व पत्नी दोघांनाही घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याची परवानगी आहे. ज्यामध्ये,

१) व्याभिचार- पती व पत्नी या व्यतिरिक्त जोडीदारचे इतर कोणासोबत अनैतिक संबंध असणे. दोघांची पैकी एकला चार घटकांची मौज करण्यात काही अनैतिक व चुकीचं वाटल नसेल पण त्याच्या या मनमानी मौजेपाई जोडीदार मात्र दुखवला जातो. अशावेळेस हरकत घेण्याचा आणि घटस्फोट मागण्याचा हक्क त्यालाही आहे.

ia) क्रूरता- वाजवी कारणाविणा संमती शिवाय मानसिक शारीरिक त्रास देणे. विशेष म्हणजे या क्रूरतेची व्याख्या हिंदू विवाह कायद्या मध्ये कुठेही नमूद केलेली नाही. त्यामुळे ही मानसिक व शारीरिक क्रूरता स्वतंत्र पणे कोर्टात शाबीत करावी लागते. 

ib)सोडून जाणे - लग्न झाल्यापासून दोन किंवा जास्त वर्षा पर्यन्त एकमेकांपासून वेगळे राहणे. इथे physical desertion and constructive desertion असे दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात वाजवी कारणाविना जोडीदाराला सोडून जाणे आणि दुसऱ्या प्रकारात एका छताखाली एकत्र राहूनसुद्धा आपली वैवाहीक कर्तव्ये न बजावणे. 

२)धर्मांतर या प्रकारात धर्मांतर झाल्या झाल्या घटस्फोट होत नाही. तर धर्मांतर न झालेल्या जोडीदारने घटस्फोटासाठी कोर्टात तशा प्रकारचा अर्ज दाखल करावा लागतो.

३)मानसिक असमान्यता अशी मानसिक अवस्था जी कधीही पूर्णपणे बरी होऊ शकत नाही आशा अवस्थेत जोडीदार कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकतो.

४)दीर्घकालीन आजार किंवा कोड असणे २०१९ च्या Personal Amendment Act ने घटस्फोटासाठी असणारे ही कारण रद्द केले आहे.

५)Venereal disease जोडीदारस जर लैंगिक आजार असेल, ज्याला आपण Sexual Transmitted Disease  म्हणतो त्या परिस्थितीत पक्षकार कोर्टात घटस्फोट दाखल करू शकतो.

६)संन्यास घेणे पती किंवा पत्नी यापैकी एकाने जर संन्यास घ्यायचे ठरवले असेल व संन्यास घेतला असेल तर जोडीदार कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकतो.

७)७ वर्षापासून बेपत्ता असणे या परिस्थितीत जोडीदार प्रथमतः किमान ७ वर्षे बेपत्ता असणे आवश्यक आहे. त्यासाठी आधी कोर्टात Civil Death Declaration चा दावा दाखल करावा लागतो मगच जोडीदार घटस्फोट मिळणेसाठी पात्र होतो.

आता कलम १३(१-A) काय म्हणत पाहुयात.

(१ )कोर्टाने Judicial Separation  चा हुकूमनामा करून १ वर्ष किंवा त्याहून अधिक काळ लोटला आहे तरी सुद्धा पती व पत्नीने एकत्र राहण्यास सुरुवात केली नसेल तर दोघेही घटस्फोट मिळणेसाठी पात्र होऊ शकतात.

(२ )कोर्टाच्या Restitution of Conjugal Rights म्हणजेच वैवाहिक हककच्या प्रत्यस्थापना हुकूमनामा झाल्यानंतर सुद्धा त्या हुकुमानाम्याच्या तारखेपासून एक वर्ष किंवा अधिक काळ लोटला असेल आणि अद्याप त्या पती पत्नी ने एकत्र राहण्यास सुरुवात केली नसेल तर पती वा पत्नी यांना परस्पर विरोधी घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे.

कलम १३(२ ) अन्वये पत्नी पुढील कारणास्तव पाटील घटस्फोट देऊ शकते ते म्हणजे

१)बहुपत्नीत्व जर पतीची एक पत्नी जिवंत असताना सुद्धा जर त्याने दूसरा विवाह केला असेल तर पहिल्या पत्नीला किंवा दुसऱ्या पत्नीला घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे.

२) विधी पूर्वक विवाह झाल्यानंतर सुद्धा पती हा बलात्कार, संभोग, पशुगमन या गुन्ह्याखाली दोषी असल्यास पत्नी पतिविरुद्ध घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकते.

३) पती विरुद्ध Maintenance (पोटगी) चा हुकूमनामा पारित होऊन सुद्धा दोघेही वेगळे राहतात व पती वैवाहिक कर्तव्य बजावत नसेल तर पत्नीस घटस्फोट घेण्याचा हक्क प्राप्त होतो.

४)विवाहाच्या वेळेस पत्नीचे वे १५ वर्षांच्या आत असेल आणि तिच्या वयाची १५ वर्ष पूर्ण झाल्यावर परंतु १८ वर्ष होण्या आधी तिने विवाहास नकार दिला असेल तर ती पती विरुद्ध घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकते. जरी दोघांच्या मध्ये वैवाहिक संबंध तयार झाले असले तरी.

हीच गोष्ट हिंदू विवाह कायद्याला मुस्लिम कायद्या पासून वेगळी करते. मुस्लिम कायद्या प्रमाणे जर पती पत्नी यांच्या मध्ये शरीर संबंध आले असतील तर मुस्लिम पत्नी ही लग्न संबंध तोडू शकत नाही. म्हणजेच ही तरतूद हिंदू पत्नी साठी १५ वर्ष पासून १८ वर्षा पर्यंतच उपलब्ध आहे.

परस्पर संमतीने घटस्फोट कलम १३(ब)

या कलमात पती व पत्नी एकमेकांच्या संमतीने घटस्फोट दाखल करतात ज्या मध्ये मे. कोर्ट त्यांना विचार विनिमय साठी ६ महिन्यांचा कालावधी देते. व ६ महिन्यांच्या कालावधी नंतर व १८ महिन्यांच्या आत पुन्हा एकदा घटस्फोटासाठी संमती दर्शवल्या नंतर कोर्टाद्वारे त्यांच्या विवाहाचे वेच्छेदन होते. लग्न झाल्यापासून एक वर्षानंतर पती व पत्नी हा अर्ज दाखल करू शकतात.      

 आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या व्यक्ती चा विवाह हिंदू प्रथा रूढी परंपरा धर्मशास्त्र यानुसार म्हणजेच कलम ७ मधल्या प्रथा नुसार संपन्न झाले आहे तेच जोडीदार केवळ कलम १३ खाली घटस्फोट मिळणेसाठी पात्र असतात. हिंदू विवाह कायद्यानुसार वधू आणि वर यांच्या घराण्यातील रूढी परंपरा प्रथा यानुसार विवाह करणे आवश्यक आहे. जर घराण्यात "सप्तपदी" या प्रथेचा समावेश असेल तर सप्तपदी  पूर्ण झाल्याशिवाय विवाह पूर्ण होत नाही. त्यामुळे मंदिरात जाऊन केवळ गळ्यात हार घालणे किंवा भांगांत कुंकू भरणे अथवा गळ्यात मंगळसूत्र घालणे हा वैध विवाह ठरत नाही.

Contested Divorce

म्हणजेच एकतर्फी घटस्फोट. जेव्हा दाखल केला जातो तेव्हा त्या अर्जाची चौकशी दिवाणी प्रक्रिया संहिते नुसार होते. म्हणजे पती अथवा पत्नी यांपैकी एकाने अर्ज दाखल केल्या नंतर कोर्ट विरुद्ध बाजूला summons काढते. समानेवाला (मग ते पती असो वा पत्नी ) कोर्टात हजार राहून आपले सविस्तर म्हणणे या अर्जाला देतात. त्या नंतर अर्ज आणि अर्जाला दिलेलं म्हणणं या pleading च्या  अनुषंगाने अर्जदार व सामानेवाला यांचा पुरावा होतो. त्या नंतर वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर प्रकरणाचा न्याय निवाडा होतो. मग या संबंधित प्रकरणात जर  maintenance, custody (पोटगी किंवा मुलांचा ताबा) साठी अर्ज दाखल केले असतील तर ते सुद्धा  अर्ज या प्रकरणात चालविले जातात.                        

खरं सांगायचं तर, 

“घटस्फोट” हा शब्द उच्चारायलासुद्धा अनेक लोकांची हिम्मत होत नाही. हा शब्द अस्पृश्य असाल तरी त्याचे चटके मात्र वाढत्या संख्येने बसू लागले आहेत, हे वास्तव नजरेआड करून चालणार नाही. बदलत्या कालमानांत स्त्री – पुरुष एकत्र येणार, त्याहून अधिक वेगाने ते परस्परांपासून लांब जाणार ही गोष्ट अपरिहार्य आहे. त्यामुळे घटस्फोट “घ्यावा का?” वगैरे या निरर्थक प्रश्नात अडकून बसण्यापेक्षा वेगळं होण्याची अधिक सभ्य, सौजन्यशील रीत शोधून काढणं जास्त गरजेच आहे. संवादाच्या साऱ्या शक्यता संपल्यावर एखाद्या चांगल्या वकिलचा शोध घ्यावा आणि घट्ट मनाने पुढल्या तजवीजीकरिता लागावं हेच महत्वाचं!

लेखिका,

अॅडव्होकेट श्रेया सुजय सापटणेकर-देशपांडे    

धन्यवाद 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नोटरी वकील म्हणजे काय?

मोजणी अर्ज कसा करायचा? कोर्टाद्वारे मोजणी करून घेता येते?

महसूली प्रकरणांच्या न्यायनिवाड्यासाठी स्वतंत्र न्याययंत्रणेची गरज